चिंचवडच्या भाट नगरमध्ये लागलेली आग अग्निशमन विभागाच्या पथकाने आणली नियंत्रणात



पिंपरी(लोकजागृती), : चिंचवड येथील भाट नगर परिसरात आज सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास एका अॅक्रिलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. थेरगाव उप अग्निशमन केंद्र , नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या. घटनेची माहिती घेऊन जवानांनी शिताफिने आग नियंत्रणात आणली.
आगीमुळे संबंधित अॅक्रिलिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, नागरिकांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

