महानगरपालिकेची ‘सर्वसाधारण सभा’. या सभेत शहराच्या हिताचे अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर


महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज ‘लाईव्ह’ (थेट प्रक्षेपण) करण्याबाबत
पिंपरी (लोकजागृती ) उपरोक्त विषयान्वये आपल्या निदर्शनास एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकशाहीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने आवश्यक असा विषय आणू इच्छितो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील एक महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावलौकिक मिळवलेली महानगरपालिका आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात, ती म्हणजे महानगरपालिकेची ‘सर्वसाधारण सभा’. या सभेत शहराच्या हिताचे अनेक महत्त्वाचे ठराव मंजू केले जातात, विकासकामांवर चर्चा होते आणि करदात्या नागरिकांच्या पैशांचे नियोजन केले जाते.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधी सभागृहात कशा प्रकारे प्रश्न मांडतात आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रिया कशी चालते, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. प्रशासनात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा, याकरिता सर्वसाधारण सभेचे कामकाज महानगरपालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित (Live Streaming) करणे काळाची गरज आहे. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारे कामकाज लाईव्ह करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत आहोत, त्यामुळे हे पाऊल उचलणे प्रशासनासाठी सहज शक्य आहे.
तरी, जनहित आणि पारदर्शकता लक्षात घेता, आगामी सर्वसाधारण सभेपासून हे कामकाज लाईव्ह करण्याबाबत संबंधित विभागाला त्वरित आदेश द्यावेत, ही नम्र विनंती.




