पिंपरी चिंचवडक्रीडा

शोले @ (१५ ऑगस्ट १९७५)  ५० वर्षानंतरही लोकप्रियता कायम

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )केवळ भारतात नव्हे तर जगभरातील चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणारा शोले हा सिनेमा भारतातील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी सिनेमा मानला जातो. कित्येक वर्षे शोलेचा हा विक्रम अबाधित होता.‘बीबीसी’ने शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून शोलेची निवड केली. ‘फिल्मफेअर’ने ‘५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून शोलेचा सन्मान केला. या सिनेमावर आतापर्यंत कितीतही लिहून आणि बोलून झाले आहे, अजूनही कोणत्या न कोणत्या माध्यमातून शोलेविषयीची चर्चा सुरूच असते. ते भाग्य इतर कोणत्या सिनेमाला मिळालेले नाही. आतापर्यंत देशभरात लाखो सिनेमे प्रदर्शित झाले असतील. किंबहुणा काल-परवा आलेले चित्रपट जिथे लक्षात ठेवणे अवघड असते. अशावेळी गेल्या ५० वर्षांत शोलेची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.

(ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर यांच्या ‘लंबी रेस का घोडा’ या पुस्तकातील संपादित लेख)

१५ ऑगस्ट १९७५….देशभरात शोले सिनेमा प्रदर्शित झाला. दोन वर्षाहून अधिक काळ अथक परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या शोलेसाठी तीन कोटी रूपयांहून अधिक खर्च झाला होता. अगदी सुरूवातीला शोलेची लांबी खूपच मोठी होती. संकलनानंतरही सिनेमा तब्बल २०० मिनिटांचा अर्थात ३ तास २० मिनिटांचा होता. भव्यता, तगडी स्टार कास्ट, विदेशी तंत्रज्ञ-कलावंत, ७० एमएमचा पडदा, स्टिरिओफोनिक साऊंड अशा अनेक कारणांमुळे प्रदर्शनपूर्व काळापासूनच शोले भरपूर चर्चेत राहिला होता.

मात्र, जेव्हा शोले प्रदर्शित झाला, तेव्हा सुरूवातीचे काही दिवस शोलेला थंड प्रतिसाद होता. सिनेमाप्रेमी प्रेक्षक शोले सुरू असणाऱ्या चित्रपटगृहांकडे फारसे फिरकत नव्हते आणि त्याचे कारणही स्पष्ट होत नव्हते. निर्माते जी. पी. सिप्पी, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासह चित्रपटाशी संबंधित सर्वच घटकांमध्ये तेव्हा चिंतेचे वातावरण होते. पहिल्या दिवसापासून सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडतील, अशी त्यांची अटकळ होती. प्रत्यक्षात सर्वांचाच अपेक्षाभंग झाला होता. त्यातच तिकिट खिडकीवर शोले आपटणार, अशीच चर्चा होऊ लागली. तशाप्रकारचे नकारात्मक समीक्षण वतर्मानपत्रांमध्ये छापून येत होते. शोलेच्या भवितव्यावरून सर्वजण धास्तावले होते.

 

अशा परिस्थितीत रमेश सिप्पी यांनी स्थितीचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यासाठी अमिताभ बच्चनच्या मुंबईतील निवासस्थानी निवडक सहकाऱ्यांची बैठक घेतली. नेमके काय चुकले, याविषयी चर्चा करण्यात आली. बराच खल झाल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, चित्रपट सर्व बाजूने विशेषतः तांत्रिक अंगाने उत्तम झाला आहे. मात्र, अमिताभ बच्चनचा अर्थात जयचा मृत्यू हा कळीचा मुद्दा ठरतो आहे. अगदी शेवटपर्यंत मित्रत्वाचे नाते निभावणारा, र्निव्यसनी, विधवा महिलेशी लग्न करण्याची तयारी दाखवणाऱ्या जयचा डाकूंच्या बेछूट गोळीबारात दर्दनाक मृत्यू होतो. स्वतःचा जीव तो वाचवू शकत असतो. परंतू, मित्र वीरू आणि त्याची प्रेयसी बसंतीचा जीव वाचवण्यासाठी जय डाकूंना सामोरा जातो आणि स्वतःच्या प्राणाला मुकतो. अशाप्रकारचा हृदयद्रावक शेवट प्रेक्षकांना रूचला नसावा. म्हणूनच नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असाव्यात. त्यामुळे सिनेमाचा शेवट बदलण्यात यावा. जय जीवंत राहतो आणि विधवा राधाशी (जया भादुरी) तो लग्न करतो. असा शेवट ठेवू या. म्हणजेच धमेंद्रला बसंती मिळते. तशी जयला राधा मिळेल. दोघेही वाममार्ग सोडून संसाराला लागतील, असा गोड शेवट (सुखांत) करावा, असा त्या बैठकीतील चर्चेचा सूर होता.

लेखक जोडी सलीम-जावेद यांना मात्र हे मान्य नव्हते. असा कोणताही बदल करण्यास ते तयार नव्हते. किंबहुणा, आहे तसाच चित्रपट कायम ठेवण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. थोडी वाट पाहू आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आवश्यकतेनुसार बदल करू. वेळप्रसंगी काही प्रसंगांचे पुर्नचित्रीकरण करू, असे मत सिप्पींनी मांडले. तसे ठरलेही. त्यानुसार तयारीच्या सूचना युनिटला देण्यात आल्या.

 

मात्र, नव्याने शूटींग करण्याची वेळ आलीच नाही. चमत्कार घडल्याप्रमाणे शोलेच्या प्रेक्षकांची संख्या वाढू लागली. ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे सिनेरसिकांचे लोंढे सिनेमागृहांकडे येऊ लागले. तिकिटांसाठी दूरदूरपर्यंत रांगा लागू लागल्या. चढ्या दरात तिकिटांचा काळाबाजार होऊ लागला. हाऊसफुल्लचा बोर्ड दिसू लागला, तो कित्येक आठवडे कायम राहिला. मुंबईतील मिनर्व्हा सिनेमागृहात शोले तब्बल पाच वर्षे सुरू होता. याशिवाय, राज्यभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये शोलेने २५ आठवडे, ५० आठवडे, ७५ आठवडे, १०० आठवडे मुक्काम ठोकला. त्या काळातील तिकीट खिडकीवरचे उत्पन्नाचे सर्व विक्रम शोलेच्या नावावर जमा झाले होते.

 

सगळ्याच व्यक्तीरेखा लोकप्रिय

जी.पी. सिप्पी यांची निर्मिती व त्यांचे पुत्र रमेश सिप्पी यांचे दिग्दर्शन असलेल्या शोलेचे लेखन सलीम खान व जावेद अख्तर या लेखक जोडीने केले होते. धर्मेंद्र, संजीवकुमार, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, अमजदखान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यांनी साकारलेल्या विरू, ठाकूर, बसंती, जय, गब्बर या व्यक्तीरेखा तेव्हा प्रचंड गाजल्या. जया भादुरी (राधा), असरानी (जेलर), जगदीप (सूरमा भोपाली), विजू खोटे (कालिया), मॅक मोहन (सांभा), केश्तो मुखर्जी (हरीराम नाई), सत्येन कप्पू (रामलाल), मास्टर सचिन (अहमद), ए. के. हंगल (इमाम साहेब), लीला मिश्रा (मौसी) अशी शोलेतील इतर पात्रे, इतकेच काय हेमामालिनीच्या टांग्याची घोडी (धन्नो) देखील लोकप्रिय ठरली. आजही ही पात्रे प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

 

सिप्पींच्या ‘सीता और गीता’ सिनेमात काम केलेल्या धर्मेंद्र, हेमा मालिनी व संजीवकुमार या तिघांची शोलेसाठी पहिल्या टप्प्यातच निवड करण्यात आली. ठाकूर आणि गब्बर या दोन्ही व्यक्तीरेखा दमदार होत्या. त्यावर अनेकांचा डोळा होता. धर्मेंद्रला विरूऐवजी ठाकूरचा रोल हवा होता. रमेश सिप्पी त्यासाठी तयार नव्हते. संजीवकुमार ठाकूर करणार, हे निश्चित झाले होते. तरीही धर्मेंद्र अडून बसला होता. तो काळ असा होता की, संजीवकुमारने हेमा मालिनीला लग्नाविषयी विचारणा केली होती. त्याचवेळी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यातील प्रेमकहानी रंगात आलेली होती. सिप्पींनी धर्मेंद्रच्या लक्षात आणून दिले की, ठाकूरचा रोल तुला दिल्यास नायकाचा (विरूचा) रोल संजीवकुमारला द्यावा लागेल. बसंती आणि विरूचे एकत्र असे बरेच प्रेमप्रसंग आहेत. यावरून धर्मेंद्रने काय ओळखायचे ते ओळखून घेतले आणि ठाकूरचा नाद सोडून निमूटपणे विरूची भूमिका स्वीकारली.

 

दुसरीकडे, संजीवकुमारला गब्बरचे आकर्षण होते. मात्र, ठाकूरची भूमिका संजीवकुमार अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल, असे सिप्पींसह अनेकांचे मत होते. अमिताभनेही गब्बरची भूमिका मिळावी, यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, सिप्पींना कोणत्याही अँगलने अमिताभमध्ये गब्बरसिंग दिसत नव्हता. सलीम-जावेद यांनी अमिताभची शिफारस जयच्या भूमिकेसाठी केली होती. अमिताभ तेव्हा नवखा होता. जयच्या भूमिकेला तो न्याय देऊ शकेल का, याविषयी सिप्पी थोडेसे साशंक होते. तोपर्यंत प्रकाश मेहरा यांचा जंजीरही प्रदर्शित झाला नव्हता. अमिताभसारख्या पडेल कलाकाराला हिरो म्हणून घ्यायला कोणी तयार नव्हते. अमिताभचे आधीचे काम पाहून सलीम जावेदने शिफारस केलेली होतीच. त्यात भर म्हणून धर्मेंद्रने अमिताभच्या विनंतीनुसार सिप्पी यांना शब्द टाकला होता. तेव्हा जयसाठी शत्रुघ्न सिन्हाचा विचार सुरू होता. मात्र, सिप्पींना अमिताभच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले.

 

गब्बरसिंगचा शोध

शोलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा गब्बरसिंगची होती. खऱ्या अर्थाने शोले हा गब्बरचाच सिनेमा होता. सुरूवातीला गब्बरसाठी प्रेमनाथ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, ते जुळून आले नाही. त्यानंतर डॅनी डेन्झोंपाचे नाव निश्चित करण्यात आले. प्रत्यक्ष काम सुरू होत असतानाच डॅनीच्या तारखांची समस्या निर्माण झाली. फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटात डॅनीची महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि त्याच कालावधीत धर्मात्माचे शूटींग अफगाणिस्तानात होणार होते. शोले किंवा धर्मात्मा या दोन्हीपैकी एकच चित्रपट करणे डॅनीला शक्य होते. डॅनीने शोलेचा विचार सोडून दिला.

शोलेची शूटींग सुरू करण्याची जवळपास सर्वच तयारी झालेली असताना गब्बरचे मुख्य पात्रच ठरले नसल्याने सिप्पी चिंतेत होते. गब्बरसाठी पुन्हा शोध सुरू झाला, तेव्हा संजीवकुमारने पुन्हा तयारी दर्शवली. किंवा प्राणला ठाकूरची भूमिका द्यावी, असेही सुचवून पाहिले. मात्र, सिप्पी तयार झाले नाहीत. बऱ्याच शोधानंतर अमजद खानची गब्बरसाठी निवड झाली, त्यास सलीम-जावेद कारणीभूत ठरले. जावेद अख्तर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ (१९६३) या नाटकात अमजदचे काम पाहिले होते. शोलेची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा सलीम जावेद यांनी मिळून अमजदची शिफारस रमेश सिप्पी यांच्याकडे केली. त्यांनी अमजदला बोलावून घेतले आणि सिप्पी यांची भेट घालून दिली. लूक टेस्ट, स्क्रीन टेस्ट आदी सोपस्कार पार पडल्यानंतर चाचणी म्हणून एक सीन चित्रीत करण्यात आला. गब्बरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. तेव्हा ‘तुझे याद रखूंगा’…अशी धमकी तो ठाकूरला कोर्टातच देतो. हा शॉट ओके झाल्यानंतर अमजद खानचे नाव गब्बरसाठी निश्चित करण्यात आले.

शोले हा खऱ्या अर्थाने अमजदच्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट होता. चित्रपट सुरू झाल्यानंतर तासाभराने गब्बरसिंगची पडद्यावर इन्ट्री होते. शोलेत गब्बरचे मोजकेच सीन असूनही सर्वात जास्त भाव तोच खाऊन जातो. इतर पात्रांना गब्बर झाकोळून टाकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र तसे झाले. करिअरची सुरूवात असूनही अमजद खानने गब्बरची भूमिका अजरामर केली.

चित्रीकरणादरम्यान अमजद खानला अभिनय जमत नाही, त्याचा आवाज गब्बरसिंगच्या व्यक्तीरेखेला न्याय देत नाही. तो खूपच कमकुवत वाटतो, असा नकारार्थी सूर सेटवर व्यक्त होत होता. ही चर्चा वाढू लागली, तेव्हा रमेश सिप्पी यांच्या कानावरही गेली. तेव्हा अमजदच्या आवाजाचे डबिंग अन्य कलाकाराकडून करून घ्यावे का, असे काहींनी रमेश सिप्पी यांना सुचवले होते. जर तुमच्या मनासारखा अभिनय होत नसेल तर अमजद खानकडून गब्बरची भूमिका काढून घेण्याची सूचना सलीम जावेद यांनी केली, अशी चर्चा तेव्हा सेटवर होत होती. प्रत्यक्षात काय घडले, यावरून वेगवेगळे मतप्रवाह होते. बरेच समज गैरसमजही झाले होते. अमजदला हे सारे समजले, तेव्हा तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. अशा गोष्टी आपल्या करिअरला मारक ठरू शकतील, याची धास्ती अमजदला होती. त्याच्या सुदैवाने सिप्पी यांनी कोणाचेही न ऐकता अमजद खानकडेच गब्बरची भूमिका ठेवली आणि त्याचा मूळ आवाजही कायम ठेवण्यात आला. त्यामुळे अमजदने सुटकेचा निश्वास सोडला. बरेच परिश्रम घेत अमजदने सुधारणा केली. नंतर इतिहास घडला, तो सर्वज्ञात आहे.

या घटनेपासून अमजदने सलीम जावेद यांच्याशी संबंध तोडून टाकले. बोलणेही बंद केले. शोलेनंतरच्या काळात सलीम जावेद यांच्याशी संबंधित कोणत्याही चित्रपटात अमजदने कधीही काम केले नाही. प्रत्यक्षात, आपण अमजद खानला काढण्याची सूचना / मागणी कधीही केली नव्हती. त्याच्या आवाजाविषयी काहीही नकारात्मक टिप्पणी केली नव्हती, अशी स्पष्टोक्ती सलीम-जावेद यांनी नंतर वेळोवेळी केली. मात्र, अमजदची त्यांच्याविषयी असणारी नाराजी शेवटपर्यंत दूर झाली नाही.

दमदार संवाद

दमदार संवाद हे शोलेचे बलस्थान होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत शोलेचे एकेक संवाद लोकांना तोंडपाठ झाले होते. विशेषतः गब्बरचे संवाद सर्वाधिक लोकप्रिय ठरले होते. ‘कितने आदमी थे’ असो की ‘अरे ओ सांबा’… अमजदने ज्या पध्दतीने हे संवाद सादर केले. त्यावर लाखो प्रेक्षक फिदा झाले होते. बलदेवसिंग ठाकूरच्या तोंडीही भरभक्कम डायलॉग होते. शोलेतील प्रत्येक पात्रांच्या तोंडी एकापेक्षा एक वरचढ संवाद होते. ते घराघरात बोलले जात होते. त्यामुळेच शोलेच्या संवादाची स्वतंत्र ऑडियो कॅसेट काढण्यात आली. भारतात हे प्रथमच घडत होते. या कॅसेटची तेव्हा मोठ्या प्रमाणात विक्री झाली. गावागावात, चौकाचौकात, कामाच्या ठिकाणी शोलेच्या कॅसेट वाजवण्यात येत होत्या.

एकच अवॉर्ड

शोलेचे बजेट एक कोटी होते. चित्रीकरण लांबत गेल्यामुळे खर्च वाढत गेला. सिनेमा पूर्ण होईपर्यंत खर्चाचा आकडा साडेतीन कोटी रूपयांपर्यंत गेला. तेव्हा ही रक्कम खूपच मोठी होती. सढळ हाताने खर्च करण्यात आल्यामुळेच एका भव्य दिव्य भारतीय चित्रपटाची निर्मिती होऊ शकली. पुढे जाऊन शोले ब्लॉकबस्टर ठरला. सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. अवॉर्ड मात्र एकच मिळाले. शोलेचे संकलक एम.एस. शिंदे यांना बेस्ट एडिटिंगचे (संकलन) अवॉर्ड मिळाले.

कर्नाटकात शूटींग

कर्नाटकात बंगळुरूजवळच्या रामनगरम गावात शोलेतील रामगडचा सेट उभारण्यात आला होता. सेट म्हणण्यापेक्षा संपूर्ण गावच वसवण्यात आले होते. वरच्या बाजूला ठाकूरची हवेली उभारण्यात आली. तर हवेलीच्या मागे गब्बरचा अड्डा होता. गावाच्या आजूबाजूला मोठे डोंगर, कडेकपारीचा भाग होता. एखाद्या चंबळ खोऱ्याप्रमाणे हा परिसर दिसत होता. अधिकाधिक चित्रीकरण बाहेर मोकळ्यावर चित्रित करण्यात आले.

शोलेची निर्मितीप्रक्रिया जवळपास दोन वर्षे सुरू होती. अखेर, ३ ऑक्टोबर १९७३ रोजी शोलेचे प्रत्यक्ष शुटींग सुरू झाले. पहिला प्रसंग चित्रीत झाला तो म्हणजे, अमिताभ तिजोरीच्या चाव्या जया भादुरीला परत आणून देतो आणि आधीच्या रात्री तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माफी मागतो. तर, अमिताभ आणि धर्मेंद्रची संजीवकुमार तुरूंगाबाहेर भेट घेतो आणि त्यांना रामगडला येण्याचे आमंत्रण देतो. हा प्रसंग सर्वात शेवटी चित्रित करण्यात आला. जेलर असरानीसोबतचे कारागृहातील प्रसंग मुंबईत राजकमल स्टुडिओत चित्रीत करण्यात आले.

काळा बाजार, धो-धो कमाई

पहिले काही दिवस संथ प्रतिसाद होता, तेव्हा इतरांपेक्षा अमजद खान जास्त अस्वस्थ होता. माझ्या आवाजामुळे चित्रपटाला फटका बसल्याची चर्चा सर्वजण करत आहेत, अशी खंत अमजद बोलून दाखवत होता. हेमा मालिनी आणि जया भादुरी या प्रसिध्द अभिनेत्रींना दुय्यम स्वरूपाच्या भूमिका देण्यात आल्या, ते प्रेक्षकांना रूचले नाही, अशीही चर्चा दबक्या आवाजात होत होती. मात्र इतर कोणाला नसली तरी लेखक सलीम जावेद यांना चित्रपट चालणारच, याची खात्री होती. थोडीफार प्रतिक्षा करावी लागेल, इतकेच ते विश्वासाने सांगत होते. अखेर, त्या जोडीचे भाकीत खरे ठरले.

तिसऱ्या आठवड्यात गर्दी वाढू लागली. एकदा पाहून झाल्यानंतर पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची संख्या जास्त असल्याचे लक्षात येत होते. मध्यंतराला प्रेक्षक बाहेर येत नाही. क्लायमॅक्स वेळी चित्रपटगृहात स्मशानशांतता पसरते. जयचा मृत्यू झाल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, चित्रपट संपल्यानंतरही कितीतरी वेळ प्रेक्षक जागेवरच बसून राहतात, अशी विविध सिनेमागृहातील माहिती प्राप्त होत होती. नंतरच्या वाढत्या प्रतिसादाने सर्वांचे अंदाज चुकवले. नकारार्थी सूर आळवणाऱ्या समीक्षकांना खोटे ठरवले. तिकीट खिडकीवर झुंबड उडाली. तिकीटांचा काळा बाजार सुरू झाला. प्रत्येक शहरात शोले धो-धो कमाई होऊ लागली. शोले चित्रपट ‘ऑल टाईम ब्लॉकबस्टर’ ठरला. महिन्यानंतर शोलेचे संवाद असलेल्या ऑडीओ कॅसेटस् बाजारात आल्या. लोकं तासनतास शोलेचे संवाद ऐकण्याचा आनंद घेत होते. जवळपास पाच लाख कॅसेटची विक्री तेव्हा झाल्याचे सांगण्यात आले.

 

दूरदर्शनवर १५ ऑगस्ट १९९६ रोजी (२१ वर्षानंतर) पहिल्यांदाच शोले दाखवण्यात आला. त्यावेळी देशभरात रस्त्यांवर शुकशुकाट झाला होता. २१ वर्षानंतरही शोलेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नव्हती, हे तेव्हा दिसून आले. पुढे, ३ जानेवारी २०१५ रोजी शोले थ्रीडी स्वरूपात नव्याने प्रदर्शित करण्यात आला. त्यासाठी जवळपास २५ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

शोलेचे नाव सुरूवातीला ‘अंगारे’ असे ठरवण्यात आले होते. नंतर, ते शोले करण्यात आले. प्रख्यात दिग्दर्शक अकिरा कुसारोवाचा ‘सेव्हन सामुराई’ (१९५४) तसेच ‘बँडिटस्’ (१९६७) या पाश्चात्य चित्रपटांचा प्रभाव शोलेवर होता. याशिवाय, धर्मेंद्र-विनोद खन्ना यांचा ‘मेरा गॉव मेरा देश’ नुकताच हीट ठरला होता. त्याचे काही धागेदोरे शोलेशी मिळते जुळते होते. शोलेची गाणी आनंद बक्षी यांची तर संगीत आर. डी. बर्मन यांचे होते. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’…हे गाणे आजही खऱ्या दोस्तीची मिसाल म्हणून सांगितले जाते. शोलेत एक कव्वाली होती. चित्रपटाची लांबी खूपच वाढल्याने ती वापरण्यात आली नाही.

 

शोले हा चित्रपट इतका प्रचंड हीट होईल, असे काही वाटले नव्हते. कथानक पूर्ण होत गेले, तसे त्याची व्याप्ती लक्षात आली. निर्माते जी. पी. सिप्पी यांनी कशाचीही कमतरता भासू दिली नाही. त्यांनी भरपूर खर्च केला. ५० वर्षापूर्वीच्या काळात कोट्यवधी रूपये खर्च करणे फारच धाडसाचे होते. शोलेच्या शूटींगसाठी जे रामगड गाव वसवले गेले. त्या गावातील रस्ते केले. हवेली तयार केली. पूल बांधला. साहसदृश्ये चित्रीत करण्यासाठी बाहेरून तंत्रज्ञ आणले. कास्टींग परफेक्ट झाली. सर्व गोष्टी जुळून आल्या. परिणामी शोलेसारखा भव्य दिव्य चित्रपट तयार झाला. तो प्रेक्षकांना मनापासून आवडला.

– जावेद अख्तर, लेखक

 

खरोखरची गोळी सुटली

शोलेत शेवटी (क्लायमॅक्स) गब्बरच्या तावडीत सापडलेल्या धर्मेंद्र आणि हेमामालिनीला सोडवण्यासाठी अमिताभ बच्चन अड्ड्यावर येतो, असा सीन आहे. अमिताभ उंच टेकडीवर असतो. गोळी उडवून दोरखंडाने बांधून ठेवलेल्या धर्मेंद्रला तो बंधमुक्त करतो. त्यानंतर, धर्मेंद्र हेमामालिनीसह तेथील बंदुका आणि गोळ्यांचा साठा घेऊन बाहेर पडतो. या प्रसंगाचे चित्रीकरण करताना धर्मेंद्रकडून हवेत खरोखरची गोळी सुटली होती आणि ती गोळी अमिताभच्या कानाजवळून गेली होती. सुदैवाने अमिताभला किंवा सेटवरच्या कोणालाही इजा झाली नाही. मात्र, अशाप्रकारे गोळी झाडण्याच्या प्रकारावरून बराच तमाशा झाला होता. त्या दिवसाचे शूटींग बंद करावे लागले होते.

 

सेन्सॉर बोर्डामुळे शेवट बदलला

सेन्सॉरमुळे शोले चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला. मूळ कथेत ठाकूर बलदेवसिंग हा गब्बरसिंगला हाल हाल करून मारून टाकतो. हात नसले तरी पायातील खिळे असणाऱ्या बुटांचा वापर त्यासाठी ठाकूर करतो. अशाप्रकारचा शेवट सेन्सॉर बोर्डाला मान्य नव्हता. पूर्वाश्रमीचा वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेला ठाकूर कायदा हातात घेऊन खून करतो. हा प्रसंग त्यांना आक्षेपार्ह वाटला. तो काळही आणीबाणीचा होता. परिणामी, अर्धमेल्या अवस्थेतील गब्बरला ठाकूर पोलिसांच्या स्वाधीन करतो, असा शेवट दाखवण्यात आला.

 

चुकाही भरपूर

शोलेच्या संवादांवरून, विविध पात्रांवरून जितकी चर्चा झाली, त्याचपध्दतीने शोलेतील चुकाही शोधून-शोधून काढण्यात आल्या. त्या चुकांवरून आजही खिल्ली उडवली जाते. रामगड गावात वीज उपलब्ध नसते. जया भादुरी रोज सायंकाळी दिवे लावताना दिसते. वीज नसलेल्या गावात पाण्याची इतकी मोठी टाकी कशी काय असते. इतक्या उंचावरील टाकीत पाणी चढणार कसे, पाण्याची मोटार चालणार कशी. गावात वीज नसताना मशीदीवरील कर्ना वाजतो, त्यावर अजान सुरू होते. हात तोडलेल्या ठाकूरचे पाठीमागे बांधलेले हात दिसत होते, असे अनेक प्रसंग सांगितले जातात.

 

शोलेच्या रिमेकची टिंगलटवाळी 

राम गोपाल वर्मा यांनी २००७ मध्ये ‘आग’ नावाचा सिनेमा तयार केला, तो शोलेचा रिमेक होता. अमिताभ बच्चनने त्यात गब्बरची भूमिका केली होती. रमेश सिप्पींच्या शोलेत अमिताभला गब्बरची भूमिका करण्याची तीव्र इच्छा होती. तथापि, सिप्पी यांनी नकार दिला होता. ही इच्छा अमिताभ बच्चनने ३० वर्षानंतर आग या चित्रपटात पूर्ण केली. रामगोपाल वर्माचा हा चित्रपट तिकीट खिडकीवर खूपच वाईट पध्दतीने आपटला. तत्कालीन परिस्थितीत आग हा सिनेमा सर्वाधिक टिंगलीचा विषय ठरला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button