पिंपरी चिंचवड

एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य दिव्य अशा दिमाखदार शिवजयंती सोहळ्याचे आयोजन .

Spread the love

पिंपरी (lokjagruti )दि. १९ फेब्रुवारी ,एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल, मोहनवाडीच्या प्रांगणात शिवजयंतीचा सोहळा मोठ्या जल्लोषात , उत्साहात व शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात लाल महाल , शनिवारवाडा येथून शिवज्योत प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी पारंपारिक मावळ्यांच्या वेशभूषेत व विद्यार्थिनींनी नऊवारी साडीमध्ये स्केटिंगवरून शिवज्योत शाळेच्या प्रांगणापर्यंत आणली. शिवज्योतीचे स्वागत शिवगर्जनेने ढोल- ताशांच्या गजरात , लेझीम नृत्यने करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने श्री छत्रपती शिवरायांची आरती तसेच पाळणा गाऊन करण्यात आली . यावेळी संपूर्ण शाळेचे वातावरण शिवमय झाले होते. पूर्व प्राथमिक सत्राच्या चिमुकल्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजामाता व मावळे यांची वेशभूषा केली होती. छोट्या मावळ्यांनी नृत्यातून आपला शिवजन्मोत्सवाचा आनंद व्यक्त केला. चिमुकल्या बालचमुन्नी “शिवराज्याभिषेक सोहळा” व ‘अफजलखानाचा वध ’ या लघुनाट्यांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. छोट्या शाहिरांनी आपल्या पोवाड्यातूंन शिवरायांची कीर्ती गायली. तिसरी ते नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्कारातून संपूर्ण शिवचरित्र सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ‘स्वराज्यनिष्ठा’ या नाटिकेद्वारे शिवकालीन युगातील न्याय पद्धती, देशप्रेम ,निस्वार्थ सेवा आणि बलिदान याचे देही याची डोळा उपस्थितांनी अनुभव करून दिला . त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपारिक नऊवारी साडीमध्ये रोमहर्षक दोरी मल्लखांब ,खांब मल्लखांबाचे सादरीकरण केले. लाठी-काठी द्वारे शिवकालीन युद्ध कौशल्य सादर केले. विद्यार्थिनींनी नऊवारीमध्ये लेझीमच्या तालावर ठेका धरून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी जणू काही आपण त्याच शिवकालात, शिवसृष्टीत, शिवकालीन व्यवस्थेत आहोत असे उपस्थितांना वाटले.

यावेळी नगरसेविका सौ. शीतल सावंत नगरसेविका सौ. नंदिनी धेंडे ,माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , शाळेच्या माजी विद्यार्थिनी शिवव्याख्याता कुमारी दीप्ती धनावडे , शिवव्याख्याते अक्षय वाघचौरे व ससून हॉस्पिटल रक्तपेढी प्रमुख डॉ. शंकर मुंगावे, दिलीप देवकर व मंगेश पवार हे प्रमुख पाहुणे लाभले.

यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “ हे जीवन जगत असताना आपण ज्या मायभूमीत जन्माला आलो, त्या मायभूमीचे ऋण म्हणून आपण त्या मायभूमीचे रक्षण करावं.” “ स्वातंत्र्यात जगणं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं.” शिवकालीन व आजच्या परिस्थितीची तुलना तुलना मांडताना ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी जो लढा दिला, तो लढा परदेशी आक्रमणाच्या विरोधातला लढा होता. शिवाजी महाराजांनी आपापसात कधी तंटे केले नाहीत. असे आपल्या राजांचे आगळे वेगळे नेतृत्व होते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. असे विचार त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. सौ. शितल सावंत यांनी विद्यार्थ्यांशी व उपस्थितांशी संवाद साधला. शाळेत विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन जागृत केले जात आहे याबद्दल त्यांनी शाळेचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. त्या पुढे म्हणाल्या, “सर्व विद्यार्थ्यांनी एक आदर्श मनामध्ये ठेवला पाहिजे जरी मी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकलो नाही; तरी महाराजांचे आदर्श त्यांचे विचार मनामध्ये घेऊन पुढचं पाऊल मी टाकणार”, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सौ. नंदिनी धेंडे म्हणाल्या स्त्रीवादी दृष्टिकोन व गोरगरिबांविषयीचा कळवळा, सर्वधर्मसमभाव अशा कितीतरी गोष्टी आपण शिवचरित्रातून शिकू शकतो आणि तेव्हाच आपण चांगला माणूस चांगले नागरिक म्हणून घडू शकतो. या सोहळ्याप्रसंगी शिवव्याख्याता दीप्ती धनावडे यांनी शिवचरित्रातून “पन्हाळगडचा वेढा” सादर करत इतिहासाची पाने डोळ्यांसमोर उलगडली . शिवव्याख्याते अक्षय वाघचौरे यांनी आपल्या व्याख्यानातून व पोवाड्यातून राजांचे गुणगान गायले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की ,”भगवा ध्वज घेऊन नाचण्यापेक्षा महाराजांचे विचार घेऊन चला, तेव्हा तुम्हाला तुमच्यात महाराज दिसतील .” “तुम्ही इतिहास वाचा कारण आपला इतिहास धगधगता आहे. शिवचरित्र म्हणजे केवळ शौर्य, पराक्रम, धैर्य, शत्रूशी दोन हात करून झुंज देणे , मुलुख काबीज करणे एवढेच नव्हे तर यापेक्षाही महाराजांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. महाराजांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करून भावी पिढी कशी असावी त्यांनी हेही पटवून दिले.

कार्यक्रम प्रसंगी बोलताना शाळेचे संस्थापक श्री. लक्ष्मणराव देवकर यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. परदेशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासले व शिकवले जाते याचा अभिमान वाटतो. ते पुढे म्हणाले की जगातील इतर राजांपेक्षा आपले राजे वेगळे का आहेत कारण ; त्यांनी स्वतः स्वराज्य निर्माण केले. रयतेचे राज्य, सुराज्य निर्माण केले. समाजातील सर्व घटकांना घेऊन पुढे जाणारे राजे म्हणून इतिहासात ते एकमेव आहेत . विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून व महाराजांचा इतिहास अभ्यासला जावा म्हणून त्यांनी राज्य शासनाला आवाहन केले की, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राजांचे चरित्र व राजांच्या इतिहास समाविष्ट करावा. यावेळी शाळेचे सचिव श्री. संदीप देवकर मुख्याध्यापिका सौ. प्रसिदा रविशंकर , माजी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button