सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”


(लोकजागृती) “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे दोन शब्द म्हणजेच पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य. हे दोन शब्द प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दिसत असले तरी त्या दोन शब्दाचा अर्थ खुप मोठा आहे. सद्रक्षणाय म्हणजे सर्व जनतेच्या मालमत्तेचे व जिविताचे रक्षण करणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आणि खलनिग्रहणाय म्हणजे समाजातील दृष्ट बाबींचा व दृष्ट लोकांचा सर्वनाश करण्यासाठी सदैव तत्पर.
पोलीस सदैव कर्तव्यासाठी तत्पर असतात. पोलिसांवरती समाजाप्रती खूप मोठी जबाबदारी असते. पोलीस हे जनतेचे, मालमत्तेचे व लोकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. तसेच त्यांच्यावर गुन्हेगारी कमी करण्याचे देखील आव्हान असते. शासनाने केलेले नियम व सदर नियमाची काटेकोरपणे अंमबजावणी करणे ही मोठी जबाबदारी पोलिसांवरती असते. पोलिसांकडून जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. पोलिसांना दैनंदिन कर्तव्य पार पाडताना अनेक जबाबदाऱ्या असतात. जबाबदारी जनतेच्या रक्षणाची असते, तर गुन्हेगार कमी करण्याची असते, नियम पाळणे व दुसऱ्याकडून पाळवून घेणे ही सुध्दा एक जबाबदारी असते. कधी नाकाबंदी, बीट मार्शल, बंदोबस्त, तर कधी ठाणे अंमलदार, कोर्ट मॅटर, तपासकार्य, व्ही. आय. पी बंदोबस्त, मोर्चे बंदोबस्त, खेळांचे बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, नेत्यांची सुरक्षितता, गस्त घालणे तर कधी जनतेच्या जमावाला सामोरे जाणे अशी कामे आपले पोलिसबंधू, पोलिसदादा, पोलिसमामा, पोलिसकाका पार पाडत असतात. समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतात. किचकट गुन्ह्याचा योग्य रित्या तपास करुन ते बोभाटा न होता छडा लावत असतात.
पोलीस म्हणजे म्हटले जाते, पोलीसांना ८ तास ड्युटी केली आहे. ती आठ तास ड्युटी फक्त बोलण्यापूर्ती मर्यादित. पोलीस दररोज १२ तासापेक्षा जास्त काम करत असतात पण त्यांना त्या ओव्हरटाईम चा एकही रुपया मिळत नाही. काही कामे अशी असतात की सलग चोवीस तास काम करावे लागते पण ना आंदोलन करता येतं ना उपोषण. जे शासन देईल त्यातच त्यांना खुश रहावं लागतं. त्यांच्या कामाचे नियोजन स्वातंत्र्यानंतर आजही झालेले नाही. सकाळी नऊपासून ड्युटीवर हजर असलेल्या कर्मचाऱ्याची घरी जाण्याची वेळ कधीच निश्चित नसते. कधी अचानक बंदोबस्त लागतो तर कधी नाकाबंदी. पण ते कधीही उपोषण, आंदोलन न करता सज्जनांचे रक्षण व दुर्जनांवर नियंत्रण ठेवण्यास प्रथम प्राधान्य देतात.
पोलीस कर्मचाऱ्यावर- अधिकाऱ्यांवर पडणारा कामाचा बोजा याचे प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशन मधील असलेली पोलिसांची रिक्त पदे. महाराष्ट्राला अजून खूप पोलीस संख्याबळाची आवश्यकता आहे. यंदाच्या पोलीस भरतीमध्ये पंधरा हजार पदे निघून सुध्दा खूप पोलीस पदे अजूनही रिक्तच आहेत. हे केवळ कमी संख्येचे पाठबळ महाराष्ट्र पोलिसांना आहे. छत्तीस जिल्ह्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची बारा करोड लोकसंख्या बघता किती पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तुम्हीच सांगा! लोकसंख्या बघता पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे खूप आहेत. पोलिसांवरील ताण कमी होण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्याबळाची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. पोलिसांची संख्या जर कमीच राहिली तर दिवसेंदिवस पोलिसांवरील ताण वाढणार आहे. महाराष्ट्राची झपाट्याने वाढती लोकसंख्या बघता दरवर्षी किमान दोन मोठ्या संख्याबळाने पोलीस भरती पार पडणे गरजेचे आहे. पोलीस कर्मचारी- अधिकारी यांचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना हक्काची सुट्टीही मिळत नाही. सलग १२ ते २४ तास ड्युटी करुन पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिसांना उतारवयात होणारा मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या सारखे आजार वाढत आहे. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभाला जाऊ शकत नाहीत. कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. यासाठी तोडगा एकच आहे की, पोलीस संख्याबळ वाढवलं पाहिजे तरच पोलिसांवरील ताण कमी होईल आणि पुढे होणारे त्रासदायक परिणाम कमी होतील.
पोलिसांकडे बघता आपल्याला त्यांच्यात एक वेगळी शिस्त दिसून येते. कामात चोखपणा, सर्व ठिकाणी कर्तव्यदक्षपणा आपल्याला दिसून येतो. पोलीस त्यांचे कर्तव्य ड्युटीवर नसताना ही पार पाडत असतात. मग ती कुणाला मदत असो वा कोणी गुन्हेगार पकडणे असो. या मागे आपल्याला अशी उदाहरणे कितीतरी वेळा आढळून आली आहेत. वाहतूक पोलिसांचे पांढरे कपडे बघता आपल्याला कुठेच त्यांच्या कपड्यावर लहानसा डागही दिसत नाही याला कारण म्हणजे त्यांना दिलेले प्रशिक्षण, प्रशिक्षणातील शिस्त, प्रशिक्षणातील शिक्षण होय. पोलीस कर्मचारी-अधिकारी करत असलेले काम हे शब्दात न मांडता येणारे आहे.
कुठलेही प्रसंग असो वा सण प्रथम पोलीस नेहमी जनतेच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतात. दिवाळी, दसरा, होळी, गणपती अशा अनेक सणांमध्ये पोलीस कुटुंबासोबत सण साजरा न करता सर्व समाजातील जनतेसोबत बंदोबस्तातून सण साजरा करतात. सणांमध्ये हाफ डे घेण्याऐवजी पोलीस डबल ड्युटी करत असतात. सणांमध्ये घरी जेवण्याऐवजी ते बाहेर काहीतरी खाऊन घेतात कारण जबाबदारीची जाणीव त्यांना खूप आधी कळाली आहे. पोलीस आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतात मग आपलाही ही हात त्यांना मदत करण्यासाठी मागे पडू नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. उदाहरणार्थ- कोणी हाक दिली म्हणून सगळा जमाव एकत्र येऊन दगडफेक करणे, शांतताभग करणे कितपत योग्य आहे? प्रत्येक समस्येचे निराकरण असते आणि ते नेहमी शांततेच्या मार्गाने सुरळीत होते. आपलीही काहीतरी जबाबदारी आहे पोलिसांना सहकार्य करण्यात, समाजात शांतता राखण्यात, पोलिसांना आपलंसं करण्यात. ते आपली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी झटत आहेत, मग आपण पण त्यांना तितकीच मदत केली पाहिजे.
महाराष्ट्र पोलीस जी कामगिरी करत आहेत, जनतेच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत त्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम!!!-
अर्चना मराळ -पिसे,
(महिला पोलीस हवालदार, लोहमार्ग मुंबई)


