क्रीडामनोरंजनमहाराष्ट्र

रंगभूमीवरील चमत्कार ‘पुन्हा सही रे सही’  @ ४५००

सुपरफास्ट" वेग हा या नाटकाचा आत्मा आहे

Spread the love

पुन्हा सही रे सही’ 

 

पिंपरी :महाराष्ट्रात मराठी नाटकांची मोठी परंपरा आहे. मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचंही महत्त्वपूर्ण काम नाटकांनी केलं आहे. अनेक नाटकांनी इतिहास घडवला आहे. असंच इतिहास घडवणारं एक नाटक म्हणजे ‘सही रे सही’. १० ऑगस्ट २०२५ रोजी चिंचवडला या नाटकाचा ४५०० वा प्रयोग होतोय. गेल्या २३ वर्षांच्या वाटचालीत सही रे सहीमुळे लाखो प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला आहे. हा आनंदमयी प्रवास यापुढेही सुरूच राहणार आहे.

—-

१५ ऑगस्ट २००२…मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात झाला. तेव्हापासून आजपर्यंत (ऑगस्ट २०२५) अर्थात गेल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत रंगभूमीवर चमत्कार ठरलेल्या ‘सही रे सही’ नाटकाने तब्बल ४५०० प्रयोगसंख्येचा टप्पा गाठला आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात १० ऑगस्टला सायंकाळी ४५०० वा प्रयोग संपन्न होत आहे. पाच हजाराव्या विक्रमी प्रयोगाच्या दिशेने नाटकाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. तो ऐतिहासिक दिवस लवकरच येईल, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही.

केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित आणि भरत जाधव यांची चौरंगी भूमिका असलेले ‘सही रे सही’ हे नाटक पाहिले नाही, असा नाट्यप्रेमी प्रेक्षक सापडणे अवघड आहे. दहा वेळा, २० वेळा, ५० वेळा ते अगदी १००-२०० वेळा ‘सही रे सही’ नाटक पाहिलेले कित्येक प्रेक्षक आहेत. नव्याने नाटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतच आहेत. प्रेक्षकांचा सुरुवातीपासून नाटकाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अगदी पहिल्याच वर्षातील ३६५ दिवसांत तब्बल ५६७ हाऊसफुल्ल प्रयोग झाले. प्रारंभीच्या काळात एकाच दिवसांत तीन-तीन प्रयोगही झाले आहेत.

सही रे सही’ नाटकाने नाट्यसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. या नाटकामुळे भरत जाधव यांच्यासह नाटकाशी संबंधित असणाऱ्या अनेकांना नाव, यश, पैसा, स्थैर्य मिळाले. इतक्या वर्षांनंतरही ‘सही रे सही’ नाटकाचे गारुड कमी झालेले नाही. गर्दीचे सूत्र कायम आहे. सातत्याने हाऊसफुल्लची पाटी लागणारे असे एखादेच नाटक असते. ते भाग्य ‘सही रे सही’ला लाभले आहे. प्रेक्षकांनी या नाटकावर, यातील कलावंतांवर मनापासून आणि भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच आता हे नाटक कोणा एका-दोघांच्या मालकीचे राहिले नसून ते पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचे झाले आहे.

एकच कलाकार एकच नाटक सलगपणे २३ वर्षे करतो आहे आणि या संपूर्ण कालावधीत प्रेक्षकांचे पाठबळ तसुभरही कमी झालेले नाही, हे भाग्य भरत जाधव यांना लाभले आहे. अनेकांचे अथक परिश्रम, भक्कम साथ, दृश्य तसेच अदृश्य स्वरूपातील मदतीचे हात, प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाची फलश्रुती म्हणजेच नाटकाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे.

प्रेक्षकांचे आभार

मुंबईत नुकतेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग पार पडला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केदार शिंदे, भरत जाधव यांच्यासह सर्व कलावंतांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

चकवा, पळापळ आणि उत्सुकता

मदन सुखात्मे, रंगा, हरी आणि गलगले अशा चौरंगी भूमिकेत भरत जाधव आपल्याला दिसत राहतात. संपूर्ण नाटकात दिसणारी भरत जाधव यांची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे. समोरून प्रेक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन त्यांना आणखी बळ देऊन जाते. जयराज नायर, मनोज टाकणे, प्रशांत विचारे अशा सर्वांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. अनिकेत राजे, दत्तू, मीरा, मनोरमा, लेले, अण्णा अशी सगळीच पात्रे धमाल आणतात. रहस्यमय धाटणीचे हे नाटक पहिल्या प्रवेशापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत खिळवून ठेवते. क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे फुलतात. ‘सुपरफास्ट’ वेग हा या नाटकाचा आत्मा आहे. यात पळापळ आहे, चकवा आहे. त्याचवेळी स्टेजच्या मागील बाजूस काय घडते, याचे अनेकांना औत्सुक्य असते.

एकूणात, एक परिपूर्ण आणि सर्वांगसुंदर नाटक पाहिल्याचा आनंद ‘पुन्हा सही रे सही’मुळे प्रेक्षकांना मिळतो.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button